ठाणे सिडको बस प्रवाशांची सत्वपरीक्षाच!: Difference between revisions
thane>Yasmin mNo edit summary |
m 1 revision imported |
(No difference)
| |
Latest revision as of 14:43, 29 December 2025
ठाणे सिडको बस प्रवाशांची सत्वपरीक्षाच!
ठाणे स्टेशन लगतचे सिडको बस स्थानक
ठाणे शहराच्या वाहतूक नकाशात सिडको बस स्थानक आणि स्टेशनलगतचे टीएमटी, नवी मुंबई परिवहन या सेवा महत्त्वाच्या आहेत. या बसेस रोज हजारो प्रवाशांना ठाणे-मुंब्रा, नवी मुंबई, अंधेरी, बोरिवली, एअरपोर्टसारख्या भागांमध्ये पोहोचवतात. पण नागरिकांसाठी उपलब्ध असणाऱ्या मूलभूत सुविधांचा पूर्ण अभाव इथे प्रकर्षाने जाणवतो.
सिडको बस स्थानकातून सुटणाऱ्या टीएमटीच्या बसेसमध्ये नेहमीच गर्दीचा सागर असतो. उन्हात, पावसात ताटकळत उभे राहणारे प्रवासी — ही रोजचीच दृश्यं झाली आहेत. “बस येईपर्यंत अंगावर ऊन ताप देतं, पावसात भिजावं लागतं, बसायचं तर जमिनीवर,” असं सांगते पूजा मोरे, जी दररोज मुंब्र्याला नोकरीसाठी जाते. छत्र नाही, पिण्याचं पाणी नाही, स्वच्छतागृह नाही — इतक्या मूलभूत गोष्टींचीही सोय नाही.
या ठिकाणाहून अनेक विद्यार्थी शाळा-कॉलेजसाठी ये-जा करतात. पण त्यांच्या वेळात बसेसची संख्या अपुरीच. “कधी बस उशिरा येते, कधी भरून निघून जाते. त्यामुळे वर्ग चुकतात,” असं सांगतो अभिषेक पाटील, ठाण्यातील एका कॉलेजचा विद्यार्थी. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बससेवा नसल्याने त्यांना अनेकदा अर्धवट तास सोडून जावं लागतं किंवा उशिरापर्यंत थांबावं लागतं.
ठाणे पश्चिमेकडील सँटिस पुलाखालून घोडबंदर, उपवन, व्रुंदावन, येऊर आदी भागांकडे टीएमटी आणि सिडकोच्या बसेस सुटतात. पण प्रवाशांची संख्या आणि बसेसची संख्या यांचं गणित जुळत नाही. “सकाळी दोन तास थांबलो तरी बस मिळत नाही. तर काही वेळा एकदम तीन बस एकाच वेळी येतात,” असं सुषमा भोसले वैतागून सांगतात. फ्रिक्वेन्सीचा अभाव, वेळापत्रकाचं पालन न होणं, आणि अति गर्दी — हेच इथलं वास्तव.
बोरिवली, अंधेरी, सिप्झ, मुंबई एअरपोर्टसारख्या दूरच्या ठिकाणी जाणाऱ्या बेस्ट आणि टीएमटी बसेसही अनेकदा वेळेवर येत नाहीत. ट्रॅफिकमुळे वेळापत्रक कोलमडून पडतं. परिणामी प्रवाशांचा ताण आणि असंतोष वाढतो.
अशा परिस्थितीत सगळ्यात जास्त त्रास होतो तो महिलांना, वृद्धांना आणि विद्यार्थ्यांना. उभं राहण्यासाठी जागा नाही, विश्रांतीसाठी जागा नाही, सुरक्षितता नाही. हेल्पलाईन नंबर आणि तक्रार निवारण कक्ष यांचा पत्ताच नाही. “बस पकडणं म्हणजे रोजची परीक्षा झालीये,” असं रेणुका शिरोळे हताशपणे म्हणतात.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही नागरिकांच्या जगण्याशी निगडीत असते. पण या बस स्थानकांवर नागरी सुविधांचा अभाव म्हणजे प्रशासनाची उदासीनता स्पष्ट दिसते. ठाणे महानगरपालिका, टीएमटी, आणि नवी मुंबई परिवहन यांनी प्रवाशांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन छत्र, स्वच्छतागृह, पिण्याचं पाणी, आणि विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सेवा यांची अंमलबजावणी केली, तरच प्रवास ‘सोय’ बनेल — अन्यथा तो ‘सततची परीक्षा’ राहील.
संदर्भ:
शीर्षक:'महिला सुरक्षा लेखाजोखा' या नावाने हा अभ्यास चालू असून या अनुषंगाने स्त्रियांच्या विविध विषयांवर यापुढे लिखाण अपेक्षित आहे.
डॉ. नीता साने, शुभदा चव्हाण (स्वराज अभियान) सुनिता कुलकर्णी, निमाताई पवार (भारतीय महिला फेडरेशन) वंदनाताई शिंदे (अंधश्रद्धा निर्मुलन समिती)