Jump to content

ठाणे स्टेशन, वंदना एसटी थांब्यावरचा स्त्रियांना त्रास

From Thane Pages
Revision as of 02:57, 8 November 2025 by thane>Admin
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)

ठाणे स्टेशन, वंदना एसटी थांब्यावरचा स्त्रियांना त्रास

ठाण्यातील वंदना बस स्टँड आणि स्टेशनलगतचा बस स्टँड — हे दोन्ही ठिकाणं रोज हजारो प्रवाशांनी भरलेली असतात. पण या गर्दीत स्त्री प्रवाशांचे हाल होत आहेत. वाहतुकीसाठी एसटी हा अजूनही सर्वसामान्यांचा आधार आहे, विशेषतः ज्या ठिकाणी इतर कोणतीही सोय नाही. मात्र या सार्वजनिक ठिकाणी मूलभूत नागरी सुविधा नाहीत, हीच खरी शोकांतिका आहे.

वंदना बस स्टँड
वंदना बस स्टँड

“बस उशिरा आली की आम्हाला उन्हात ताटकळत उभं रहावं लागतं. छपराची सोय नाही, बसण्याची जागा नाही,” असं सांगते कामावर जाणारी सुनंदा पाटील. तिच्यासारख्या अनेक महिला रोज सकाळ-संध्याकाळ या त्रासातून जातात.

वंदना बस स्टँडवर स्तनदा मातांसाठी आवश्यक ‘हिरकणी कक्ष’ नाही. ठाणे स्टेशन बस स्टँडवर तो आहे, पण इतक्या गैरसोयीच्या जागी की वापरणंच अवघड. “मुलाला दूध पाजायचं होतं, पण जागाच सापडली नाही,” असं स्वाती कदम सांगते.

महिला सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक हेल्पलाईन नंबर, तक्रार निवारण कक्ष, तसेच पोलिस चौकी — या सर्वांची फक्त कागदावर नोंद आहे. प्रत्यक्षात काहीही नाही. “एका मुलीनं बसमधली छेडछाड सांगायचा प्रयत्न केला, पण कुणी ऐकलंच नाही,” असं रंजना गावडे हळहळून सांगते.

ठाणे रेल्वे स्टेशन एसटी स्टँड
ठाणे रेल्वे स्टेशन एसटी स्टँड

बस वेळेवर येत नाही, रांगा लांब, पिण्याचं पाणी नाही, स्वच्छतागृह नाही — या सर्व गैरसोयींमुळे प्रवासी त्रासलेले, वैतागलेले दिसतात. एसटी कर्मचारीसुद्धा या परिस्थितीने हैराण आहेत.

सार्वजनिक वाहतूक हा जनतेचा कणा आहे. पण तोच जर अशा बेफिकीरीने चालवला जात असेल, तर प्रवाशांचा त्रास हा अपरिहार्य होतो. ठाण्यासारख्या शहरातल्या या दोन प्रमुख बस स्थानकांवर जर सुविधा नसतील, तर इतर ठिकाणांचा विचारच नको.

आता गरज आहे ती शासन, महानगरपालिका आणि एसटी प्रशासनाने एकत्र येऊन या ठिकाणी किमान नागरी सुविधा — छत्र, पाणी, स्वच्छतागृहे, महिला सुरक्षा — यांची तातडीने अंमलबजावणी करण्याची. कारण “प्रवास हा हक्क आहे, परीक्षा नव्हे.”

संदर्भ:

शीर्षक:'महिला सुरक्षा लेखाजोखा' या नावाने हा अभ्यास चालू असून या अनुषंगाने स्त्रियांच्या विविध विषयांवर यापुढे लिखाण अपेक्षित आहे.

डॉ. नीता साने, शुभदा चव्हाण (स्वराज अभियान), सुनिता कुलकर्णी, निमाताई पवार (भारतीय महिला फेडरेशन), वंदनाताई शिंदे (अंधश्रद्धा निर्मुलन समिती)