Jump to content

डॉ. आनंद नाडकर्णी: मानसशास्त्रातून जीवनाचा अर्थ

From Thane Pages

डॉ. आनंद नाडकर्णी: मानसशास्त्रातून जीवनाचा अर्थ

File:Screenshot 20251109 231958 Google.jpg

डॉ. आनंद नाडकर्णी (जन्म- इ.स. १९५८) हे महाराष्ट्रातील आणि विशेषतः ठाण्यातील एक अग्रगण्य मनोविकारतज्ज्ञ (Psychiatrist), लेखक, नाटककार आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी १९८० साली एम.बी.बी.एस आणि १९८४ साली मनोविकारशास्त्रामध्ये एम.डी या पदव्या मिळवल्या. त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ (IPH), मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, वेध (गेली २४ वर्षे ठाणे, पुणे, नासिक, औरंगाबाद, जळगाव आदी शहरांत व्यवसाय मार्गदर्शन उपक्रम "वेध" ) आदी संस्था आणि उपक्रमांच्या माध्यमातून मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.

एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व

[edit]

डॉ. नाडकर्णी हे केवळ डॉक्टर नाहीत, तर एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत.

* संस्कृती आणि कला: त्यांनी मानसशास्त्राला साहित्याच्या माध्यमातून सामान्य लोकांपर्यंत पोहोचवले आहे. त्यांनी लिहिलेल्या अनेक नाटकांमधून मानसिक आरोग्याचे विषय प्रभावीपणे मांडले आहेत.
* सामाजिक कार्य: व्यसनमुक्ती, आत्महत्या प्रतिबंध (उदा. IPH ची 'अस्मिता' मोहीम) आणि वृद्धापकाळात येणाऱ्या मानसिक समस्यांवर मार्गदर्शन हे त्यांचे महत्त्वाचे सामाजिक उपक्रम आहेत.
* प्रसारमाध्यमे: वृत्तपत्रे, नियतकालिके, टीव्ही आणि सोशल मीडियावर ते नियमितपणे मानसिक आरोग्याबद्दल लेखन आणि संवाद साधत असतात, ज्यामुळे त्यांची भूमिका केवळ दवाखान्यापुरती मर्यादित न राहता 'मनोशिक्षक' (Psycho-educator) म्हणून विस्तारली आहे.


सामाजिक वारसा आणि पार्श्वभूमी

[edit]

डॉ. आनंद नाडकर्णी यांच्यावर त्यांच्या कुटुंबाचा मोठा शैक्षणिक वारसा आहे. त्यांचे वडील प्राचार्य दि. स. नाडकर्णी हे एक अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते, जे ठाणा कॉलेज (सध्याचे जोशी-बेडेकर महाविद्यालय) चे पहिले प्राचार्य होते. या शैक्षणिक आणि सामाजिक पार्श्वभूमीमुळेच डॉ. नाडकर्णी यांना समाजात मानसशास्त्राचे महत्त्व रुजविण्याची प्रेरणा मिळाली.

इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ (IPH)

[edit]

२३ मार्च १९९०: ठाणे शहरात "आयपीएच" अर्थात "इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ" (मनोविकारांबद्दलच्या गैरसमजुतींविरुद्ध 'चळवळ') संस्थेची औपचारिक स्थापना

तीव्र मानसिक आजारांवर उपचार एवढ्यापुरतेच ठाण्यातील या संस्थेचे काम मर्यादित नाही. उपचारांसाठी येणारा मनोरुग्ण, त्याचे कुटुंबीय, दैनंदिन जीवनातील प्रश्नांमुळे गांजलेली व्यक्ती, कोणतीही समस्या नाही परंतु मानसशास्त्रीय ज्ञानाचा उपयोग स्व-विकासासाठी करू इच्छिणाऱ्या व्यक्ती, अशा सर्वांसाठी ही संस्था आहे. क्लिनिकल उपचार, समुपदेशन अशा रूढ मार्गांबरोबरच साहित्य, संगीत, नाट्य, चित्र, संवाद अशा आनंददायी साधनांचा कल्प्कतेने वापर केला जातो.

आज नाडकर्णींच्या ह्या संस्थेमध्ये साठ मनोविकारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक, पंचवीस आधार सदस्य आणि विविध सेवाभावी प्रकल्पांवर काम करणारे तीनशे प्रशिक्षित स्वयंसेवक कार्यरत आहेत. संस्थेचा स्वतःचा मनोआरोग्य प्रशिक्षण विभाग आहे. स्वतंत्र माध्यम विभाग, औद्योगिक प्रशिक्षण विभाग, क्रीडा मानसशास्त्र विभाग, संशोधन विभाग असे विविध गट कार्यरत आहेत. शिवाय एकाच वेळी अनेक वयोगटांसाठी अनेक सेवा, उपक्रम, प्रकल्प यांचे एक जाळे विणलेले आहे. कोणत्याही सरकारी किंवा परदेशी मदतीशिवाय ही संस्था काम करते, आणि तरीही संस्थेचं सेवाशुल्क नाममात्र आहे. डॉ. शुभा थत्ते, डॉ. अनुराधा सोवनी या मानसशास्त्रज्ञांबरोबरच विविध क्षेत्रातल्या अनेकांनी या संस्थेच्या वाटचालीत मोलाची साथ दिली आहे.

साहित्यिक डाॅ. आनंद नाडकर्णी

[edit]

डाॅ. आनंद नाडकर्णी यांनी मानसशास्त्राव्यतिरिक्त अन्य विषयांवरही पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे साहित्य मानवी मनाचे गुंतागुंतीचे पैलू आणि भावनिक संघर्ष दर्शवते. डॉ. नाडकर्णी यांनी रंगभूमीसाठी आणि अन्य साहित्यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या लेखनात विनोद, तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्रीय अंतर्दृष्टी यांचा समन्वय आढळतो. त्यांच्या 'गद्धेपंचविशी' आणि 'विषादयोग' या पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी मानसशास्त्रीय विषयांवर आधारित अनेक नाटके लिहिली आहेत, उदा. 'गटार', ज्यामुळे गंभीर विषयांना कलात्मक आणि विचारप्रवर्तक पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणले गेले. नाडकर्णी यांनी 'रंग माझा वेगळा' व 'असेच आम्ही सारे' ही व्यावसायिक नाटके लिहिली आहेत. त्यांच्या 'मयसभा' या नाटकाला लेखन पुरस्कार मिळालेला आहे. ‘मिफ्ता’च्या नाट्य विभागासाठी आनंद नाडकर्णी यांची कथासंकल्पना असलेल्या ’गेट वेल सून’ या नाटकाची त्यावर्षीच्या १० सर्वोत्कृष्ट नाटकांत निवड करण्यात आली होती.

डॉ.आनंद नाडकर्णी यांनी लिहिलेली पुस्तके

  • नाटके: असेच आम्ही सारे, रंग माझा वेगळा, आम्ही जगतो बेफाम, गेट वेल सून (नाटक कथा संकल्पना आनंड नाडकर्णींची; नाट्यलेखन प्रशांत दळवी यांचे), जन्मरहस्य (स्किझोफ्रेनियावरील नाटक), Dialogue To Wellness (मूळ मराठी -मुक्तिपत्रे; इंग्रजी भाषांतरकार - सतीश बापट), त्या तिघांची गोष्ट (या नाटकाला महाराष्ट्र सरकारचा यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे.), मयसभा (या नाटकाला लेखन पुरस्कार मिळाला आहे)
  • पुस्तके: गद्धेपंचविशी आणि विषादयोग - ताण तणावांचे नियोजन या पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार, देवराईच्या सावलीत, Nature 'N' Signature (मूळ मराठी स्वभाव-विभाव, इंग्रजी भाषांतरकार - सतीश बापट), मनोगती, मनोविकास, माझं प्रिस्क्रिप्शन, मितुले आणि रसाळ, मुक्तिपत्रे, वैद्यकसत्ता, शहाण्यांचा सायकिअ‍ॅट्रिस्ट (आत्मचरित्रपर), हेही दिवस जातील, 'मनोदीप': मानसिक आरोग्याबद्दल सोप्या भाषेत माहिती, 'संवाद': प्रभावी संवादावर आधारित, 'बदल आयुष्याचा': जीवनातील बदलांना सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन, आरोग्याचा अर्थ, एका सायकिॲट्रिस्टची डायरी, कर्मधर्मसंयोग - मर्म सात्त्विक जीवनविकासाचे, किंचित

डॉक्टरांची सामाजिक धारणा आणि प्रेरणा

[edit]

डॉ. नाडकर्णी यांची सामाजिक धारणा ही 'मानसिक आरोग्य ही केवळ डॉक्टरांची नव्हे, तर समाजाची जबाबदारी आहे' या तत्त्वावर आधारित आहे.

* प्रेरणा: त्यांना प्रेरणा मिळाली ती माणसाच्या 'आंतरिक सामर्थ्यावर' असलेल्या त्यांच्या विश्वासामुळे. कोणत्याही परिस्थितीत व्यक्तीला आपले आयुष्य सुधारण्याची आणि 'अर्थपूर्ण जीवन' जगण्याची क्षमता असते, असे त्यांचे ठाम मत आहे.
* योगदान: त्यांनी मानसशास्त्राला केवळ उपचारातून नव्हे, तर शिक्षण, कला आणि सामाजिक सक्रियतेतून जनमानसात आणले. मानसिक समस्यांना वैद्यकीय समस्या म्हणून पाहणे आणि त्यावरील सामाजिक कलंक (Stigma) कमी करणे, हे त्यांच्या कार्याच्या केंद्रस्थानी आहे.
जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाया | जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया |
मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय | माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया |
मुक्तांगणसाठी अमेरिकन धर्मवेत्ता रायनहोल्ड निबर यांच्या स्वस्थतेच्या प्रार्थनेचे डॉ नाडकर्णी यांनी केलेले भाषांतर.
मूळ प्रार्थना:
God grant me the serenity to accept the things I cannot change, Courage to change the things I can and Wisdom to know the difference

लेखाचा मूळ मसुदा मराठी विकिपीडियातील आनंद नाडकर्णी या लेखावरून घेतला आहे. त्यात अधिकची भर सिटीपीडियाच्या टीमने टाकली आहे